शनिवार, 13 दिसंबर 2014

प्राजक्त




बहर शुभ्र प्राजक्ताचा आहे माझ्याही अंगणी
बघ स्मरूनी प्राजक्ता ओळख आपली जुनी …

सजवलं माझं अंगण तू स्वतः अखंड गळून    
तुही गमावलं सारंकाही शून्यास अखेर मिळून…

पखरण केलीस फुलांची शोषूनी किरणे कोवळी          
बरसे दुसऱ्या अंगणी तरी प्रीत तुजवर भोळी…

दरवळ पसरे सर्वत्र अंगणाभोवती शिंपून         
झडशील आता क्षणात बरस तू जरा जपून… 

मीही तसाच विरक्त थोडं फुलायचं राहिलंय     
बहरून पाहिलंय फारच आता फक्त झडायचं राहिलंय ………


  

बुधवार, 5 नवंबर 2014

माळीण

चार दिवस आधी ….
केला होता ज्याचा धावा
बेताल मुजोर … पाऊस
मग असा का बरसावा … ?

ये रे, ये रे म्हणत
घातलं होतं ज्याला साकडं …
भिजूनही गेली आता
सारी सरपणाची लाकडं …

डोंगरदऱ्यापाशी दूर
माळीण गाव होत जिथे ….
विरून गेलं सारं आता
अस्तित्व दिसेना कुठे …

निद्रिस्त शांत, गाव सारं
अन करावा पावसाने कहर 
क्षणात बेचिराख सारं
उध्वस्त सारे घर …

झालं न आता समाधान
पुरती भागवलीस न हौस …
तू समोर असूनही
आता फक्त अश्रुंचाच पाऊस …

राख आता उरली फक्त
अन अंधार भरदिवसा …
झालं असेल झोडपून तुझं …
तर …….
दूर कुठे निघून जा, तू पावसा 




..… निघून जा, तू पावसा .. !!

नाती ...

जपली या जीवनी
मी कैक नाती जरी …
काही सपशेल खोटी
काही वरवर खरी …

खोट्या अशा हास्यामागे
भाव होते बनावटी ...
समोर होई उदोउदो
अन द्वेष आपल्यापाठी …

तस ही नातं टिकवायला
हल्ली कुणाला असतो वेळ ...
मृगजळामागे धावून
रंगे भातुकलीचा खेळ ...

काही नाती असतात
फक्त आठवणींमधे ...
क्लिष्ट वाटे वरून
तरी आतून फार साधे …

काही नाती मात्र
क्षणभंगुर असतात ...
विरून गेली तरी
आठवणींमध्ये दिसतात …

आठवणीच मळभ कधी
अचानक दाटून येतं ...
दुरावलेल्या नात्यांना
अवचित भेटून येतं ...

हिरमुसलं मन कधी
नात्यातला आधार शोधतं
साथ मिळेल सदा
असं कुणी साथीदार बघतं …

मिळाला असा सोबती की
नात्यातली गंमत कळते
अर्थ नात्याचा तेव्हाचं कळतो
जेव्हा छान रेशीमगाठ जुळते …

स्वच्छंद होऊन जगताना
कसं भान हरपून जावं..
कुणाच्या डोळ्यात हरवून जाऊ
इतकं आपलंसं कुणी हवं ... ….

इतकं आपलंसं कुणी हवं … !!

माझा भारत देश ...

शुरवीरांची भूमी ही
ताठ अमुचा कणा
झुकणार नाही कदापि
हाच लढवय्या बाणा

घडवले स्वराज्य स्वः हाता
अशी अमुची भारतमाता
संचारते वीज रक्तात
स्मरूनी अमुची विजयगाथा

सुजलाम सुफलाम धरा
असे ही शेतकऱ्यांची भूमी
सर्व धर्म समभाव असे
अशी ओळख अमुची जुनी

करी असाध्य रोगनिवारण
अशी आयुर्वेदाची महती
महिमा समजावुनी वेदाचा
परिचय करुनिया अवघ्या जगती

योगाचे महत्व समजले जेव्हा
पाश्चात्यांनीही केले अनुकरण
थोर महिमा ऋषीमुनींचा
जोपासावा करुनिया स्मरण

शिलेदार आम्ही देशाचे
आहोत उद्याचे आधारस्तंभ
वसा घेउनि सुराज्याचा
हाती हात घेउनिया संग

गाऊनी तुझी महती अखंड
पर्वणीच तशी आज विशेष
नतमस्तक सदा तुझ्या चरणी
असा भारत माझा देश .... ….


..माझा भारत देश .... !!

नात विश्वासाचं ..

फुलावी वेल नात्यांची
जणू दवबिंदूच्या पात्यावर ...
बीजे रुजावी ... आपुलकीची
गोड विश्वासाच्या नात्यावर …

धरुनी कास सत्याची
नात्यात गोडवा असावा …
स्मरूनी गोड आठवणी
चेहराही खुलून दिसावा …

धरलं तर राहतं जवळ
अन सोडलं तर सुटतं …
नातं हे विश्वासाचं
टिकवावं … तरच टिकतं ...

जिव्हाळ्याच्या नात्यात
प्रेम देई गंध नवा …
छानशा सोज्वळ नात्यात
संग ...सार्थ विश्वास हवा …

संग पाऊले टाकू पुढे
घेउनी हात हाती …
निर्मळ वृत्ती अंगिकारू
अन … जपूया विश्वासाची नाती … !!

मन पाखरू उनाड...

कधी मला वाटतं स्वच्छंद पाखरू मी व्हावं,
पंख ते पसरुनी उंच गगनात झेपावं...

कुण्या गावच्या दूर नदीकाठी फिरावं 
 अशा ठिकाणी जिथं कुणी कुणी नसावं...

कधी मला वाटे लहानसं लेकरू मी व्हावं,
घट्ट बिलगुनी आईच्या कुशीत मी निजावं...

कधी मला वाटे गायीचं वासरू मी व्हावं,
अपार ओढीने तिच्या अवतीभवती घुटमळावं...

कधी मला वाटे कवीचे काव्य सुंदर व्हावं
मनीच्या भावना वेचून छान शब्दात मला गुंफाव...

कधी मला वाटे नाविकाची नौका मी व्हावं,
वाऱ्याच्या दिशेने स्वतः बेफाम भिरकावं...

मन माझं पाखरू उनाड, विहरते उंच आकाशी
जगणं माझं धुंद स्वच्छंदी, गीत सजवून माझ्या सुरांशी ... !!

गुरुवार, 5 जून 2014

इष्काची बाधा ..

















प्रेम असतं तरी काय
म्हटलं पाहावं एकदा करून ...
बुडूया प्रेमात आकंठ जरा
कुण्या प्रेमाच्या गावा जाऊन …

शेवटी शोध घेण्या प्रेमाचा
म्हणून घराबाहेर पडलो …
भलतं खूळ डोक्यात
म्हणून घरच्यांशीही नडलो …

फिरता फिरता असचं कुणी
नजरेत माझ्या पडली …
खरं सांगतो वाटलं मला
साताजन्माची भेट घडली ….

पाहिलं तिने मला अन
आमची झाली नजरानजर …
स्थळ काळ ठरलं जेव्हा
तिथे जातीने मी हजर …

कुणास ठावूक आज काल
फुलमंडईत मी जातो …
न चुकता तिच्या साठी
फुल गुलाबाचं नेतो …

काय माहित कसं काय
प्रीत आमची जुळली …
नशीब होतं बलवत्तर म्हणून
घरच्यांचीही पसंती पडली ...

स्मित होतं फुललं चेहऱ्यावरती
अन गालावर लाली …


कसं सांगू राव तुम्हाला

मलाही … …. इष्काची बाधा झाली … !!

…… …… …… …… बाधा इष्काची झाली … !!

शुक्रवार, 23 मई 2014

चित्रमय चारोळ्या …




































आठवण

आठवणींच्या पुंजक्यातून
एक आठवण निघाली ..
पाखरांच्या थव्यातून
जशी स्वच्छंद पाखरं उडाली {१}

पाखरं ती अल्लड जरी
सांजेस परतून येती ..
आठ्वणींच काय
अखेर विरहच सोबती {२}

आठवणीत गुंतायला नेहमीचं
सबब असते नवनवे
औपचारिक हसून ते .... सावरणं
अन अंतरी दडवलेली फक्त ... आसवे .... !! {३}

गणराज रंगी नाचला .. !!

आली रे आली
गणरायाची सवारी
रूप देखणे - लोभस
गणरायाचे  लईभारी  ! !

कृपा गजराजाची
करी अविचाराचा नाश
दर्शने घडता श्रीचे
होई  मनास हर्ष  ! !

भेटीची रायाच्या मनी
लागलीसे आस
सत्संगाची नव्याने
धरुनी दृढ कास ! !

हेरंब गजनायक
लंबोदर विनायका
दुखात तूच तारक
सृष्टीचा विधाता  ! !

विघ्नेशाच्या कृपेने
दुखाचा रंग लोपला
सुखाची माळ सांडूनी
गणराज रंगी नाचला ..


...... गणराज रंगी नाचला  .. ! !



-- "वैभव"

माझ्या चारोळ्या ...

ओढीने तुझ्या लागतसे, जेव्हा आस अपार तगमग या जीवाची जीव बेचैनला फार
क्षणात कशी येते तुझी आठवणीची झुळूक मार ग जरा फुंकर जगावेगळा आपला मुलुक … !!




तुझ्या इथे नसण्याचा विरह जरा जरा चिंब जुन्या आठवणीत झुरव जरा जरा थबकलाही क्षणभर तुझ्यात श्वास माझा जरा नसण्यातही तुझ्या असण्याचा आभास जरा जरा … !!




जादू तुझ्या नयनांची अशी कि पाहताना माझेच भान मज न रहावं सावरून थोडं धरावी वाट परतीची अन वळताना परत तू मला का पहावं ?



धुंद आठवणीत तिच्या ...पावसा... भिजव मला जरासं बरसून चिंब सरींत या ... झुरवं मला जरासं चिंब मन झालंय माझं धुंद बेधुंद न्हाहुनी प्रीतसरींत माझ्या मिरवं जरा जरासं ... !!




बरसली सर नव्याने आता 
फुलवून सृष्टीचे अणूरेणू लालकाळ्या मातीवर 
अंथरली हिरवी चादर जणू



फुल उमलावं तसं उमलते मैत्री
हाच मैत्रीचा फायदा आहे
श्वास थांबला तरी नाही संपणार दोस्ती
हाच इथला काटेकोर कायदा आहे



आयुष्यात फार स्वप्न,
मी मनोमनी पाहिली,
वजाबाकी तर होतच गेली,
पण बेरीज करायची मात्र राहिली. 




माझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाला
पुसण्याचा फार प्रयत्न केला
पुसू तर नाही शकलो
पण माझ्या मनाचा तोल मात्र गेला. 




श्रावणसरीत चिंब भिजुनी
सृष्टी नवा साज ल्याली
धारा त्या अवचित झेलुनी
रुक्ष मनास ……… , जणू नवी पालवी आली ... !!!





पापण्यात दडवलेल्या अश्रूंनी
माझी भलतीच पंचायत केली,
थांबवलेल्या अश्रूंना ,
मग मीच मोकळी वाट करून दिली.  





स्वच्छंद प्रीतीत या,
जगण्याची रीतच न्यारी,
जणू सप्तरंगात न्हाऊन,
रंगमय झाली दुनिया ही सारी.




सर सर करत आली श्रावणसर
आठवणींची मनामध्ये उमटुनी शीतलहर
आल्हादी नितळ थेंबाचा अवचितसा स्पर्श
चिंब भिजल्या मनाला झालाय आज हर्ष  




आठवणीतलं रूप तुझं शब्दबद्ध करण्या
अनेक शब्द ग सये माझ्या मुखी येतात ..
मन वाहवत जातं आठवणीत तुझ्या
कळत नाही ... शब्दचं नकळत मग कधी मुके होतात .. !!


                                                              
                                                                   ----------------------वैभव

चंद्रकोर .. !

चंद्राची कोर कशी
वाढते कलेकलेनी
आसमंत उजळते
मिणमिणत्या चांदण्यांनी


पण नजर भिरभिरती कशी
चंद्रकोरीवरचं पडते
चंद्राचे ते रूप पाहुनी
चांदणंही गालात हसते

लोभस ते रूप पाहता
चंद्रावरचं जीव भाळतो
हिरमुसल्या चांदण्यांना
मग चंद्राचाही हेवा वाटतो ... !!


-- "वैभव"

पावसाची सर सर ..

पावसाची सर सर 
आली अंगभर 
पसरुनी शीतलहर 
थंडावले चराचर

उतरली ग्लानी अन 
उष्ण मौसमाचा ज्वर 
ओल्या मातीचा सुगंध 
धरा झाली गारेगार

पावसाची सर कशी
आलिया धावून 
तप्त मन शरीराला
नवी उमंग घेऊन

वृक्ष-वल्ली सुखावली 
पाने हिरव्या रंगात न्हाहली
रुक्ष कोरड्या मनाला 
जणू पालवी फुटली


सर येता ही नव्याने 
मनही शहारले 
रिमझिमत्या धारेने
अंग अंग थरारले

ओल्या चिंब या सरीत 
गत आठवणी दाटल्या 
टिपूर थेंबाने जणू  
दुख यातना पुसल्या


बरसल्या धारेने 
मनही चिंब चिंब झाले 
रिमझिम त्या स्पर्शाने 
मन हर्ष उल्हसित झाले


पाऊस गेला आता पडून 
धरा निपचित आहे 
ओल्या फांदीच्या फटीतून 
ऊन डोकावून पाहे 


पुन्हा पावसाची चाहूल 
वेड्या मनाला लागली 
पावसाच्या त्या ओढीने 
हुरहूर मना लागली


पुन्हा काळोख दाटला 
आकाशी मळभ हे आले 
सृष्टीच्या या चक्राचे 
कोडे मज उमगले


पावसाच्या लपाछपीत 
जीव माझा हसला 
आकाशी मळभ दिसले नि
मनी पुन्हा  पाऊस दाटला .…


……. पुन्हा पाऊस दाटला  .…!!!


                ---- "वैभव"