सोमवार, 12 नवंबर 2018

मन, सख्या

आज माझ्या मनाशी
सहज बोलून पाहिलं …
नव्हता ठाव तरी
मन जवळून पाहिलं …

झाली भेट जेव्हा
बोलायचं होतं थोडं
होईल मन मोकळं?
हेच मोठं कोडं

आहेस कसा म्हणून
सहज केली विचारपूस
बोलायचं सोडून त्याला
भांडायचीच मोठी हौस

चढला माझा पारा
अन बसलो मी रुसून
गहिवरलं मन  माझं
तेव्हा जवळ केलं हसून

उचंबळून मन यावं
असं  नेहमी घडावं
नाही नाही म्हणतानाच
जाळ्यात त्याच्या पडावं

मग मनाची स्वतःशी
फिर्याद होती केली
मनाने मग तेव्हा
सहज हसुन दाद दिली


आलं होतं भरून
सांगून मनाला टाकलं
झाल मन मोकळं
तेव्हा जरा हायस वाटलं

आता मी मनाशी
नेहमी हितगुज करतो
मग तोही माझ्याशी
सख्या सोयऱ्यासारखा वागतो !


-- " वैभव "

चारोळी

{ झोका }

आयुष्याचा झोका
घेई क्षणात गिरकी …
तगला त्याची चंगळ
अन पडणाऱ्याची फिरकी …. !!


 { बाबा }

ठीक असे मी म्हणून बळेच फसवणारे बाबा
नको चिंता कसली मनी ठसवणारे बाबा
कसली चिंता मला बाबांचे कुंपण मजभोवती
दुख एकटे झेलुनी मला हसवणारे बाबा … !!


{ पाऊस }
पाऊस बरसला अन
पुसल्या जुन्या व्यथा
नवी पालवी फुटून
जणू ...
नव्याने जगायचं आता !! 

गोळाबेरीज


क्षणात उजाडतं ..
क्षणात बहरतं ..
क्षणात बिघडलेलं ..
क्षणात सावरतं .. !!

कुठल्या तरी वळणी
कोड्यात मन पडतं ..
उकल करता करता  ...
पुरतं थिजतं .. बिथरतं .. !!


शिल्लक काय विचारू पाहता
समजतं ... उमगतं
गोळाबेरीज करता करता
अखेर आयुष्यचं मागे उरतं  .. !!

- वैभव