बुधवार, 5 नवंबर 2014

माळीण

चार दिवस आधी ….
केला होता ज्याचा धावा
बेताल मुजोर … पाऊस
मग असा का बरसावा … ?

ये रे, ये रे म्हणत
घातलं होतं ज्याला साकडं …
भिजूनही गेली आता
सारी सरपणाची लाकडं …

डोंगरदऱ्यापाशी दूर
माळीण गाव होत जिथे ….
विरून गेलं सारं आता
अस्तित्व दिसेना कुठे …

निद्रिस्त शांत, गाव सारं
अन करावा पावसाने कहर 
क्षणात बेचिराख सारं
उध्वस्त सारे घर …

झालं न आता समाधान
पुरती भागवलीस न हौस …
तू समोर असूनही
आता फक्त अश्रुंचाच पाऊस …

राख आता उरली फक्त
अन अंधार भरदिवसा …
झालं असेल झोडपून तुझं …
तर …….
दूर कुठे निघून जा, तू पावसा 




..… निघून जा, तू पावसा .. !!

नाती ...

जपली या जीवनी
मी कैक नाती जरी …
काही सपशेल खोटी
काही वरवर खरी …

खोट्या अशा हास्यामागे
भाव होते बनावटी ...
समोर होई उदोउदो
अन द्वेष आपल्यापाठी …

तस ही नातं टिकवायला
हल्ली कुणाला असतो वेळ ...
मृगजळामागे धावून
रंगे भातुकलीचा खेळ ...

काही नाती असतात
फक्त आठवणींमधे ...
क्लिष्ट वाटे वरून
तरी आतून फार साधे …

काही नाती मात्र
क्षणभंगुर असतात ...
विरून गेली तरी
आठवणींमध्ये दिसतात …

आठवणीच मळभ कधी
अचानक दाटून येतं ...
दुरावलेल्या नात्यांना
अवचित भेटून येतं ...

हिरमुसलं मन कधी
नात्यातला आधार शोधतं
साथ मिळेल सदा
असं कुणी साथीदार बघतं …

मिळाला असा सोबती की
नात्यातली गंमत कळते
अर्थ नात्याचा तेव्हाचं कळतो
जेव्हा छान रेशीमगाठ जुळते …

स्वच्छंद होऊन जगताना
कसं भान हरपून जावं..
कुणाच्या डोळ्यात हरवून जाऊ
इतकं आपलंसं कुणी हवं ... ….

इतकं आपलंसं कुणी हवं … !!

माझा भारत देश ...

शुरवीरांची भूमी ही
ताठ अमुचा कणा
झुकणार नाही कदापि
हाच लढवय्या बाणा

घडवले स्वराज्य स्वः हाता
अशी अमुची भारतमाता
संचारते वीज रक्तात
स्मरूनी अमुची विजयगाथा

सुजलाम सुफलाम धरा
असे ही शेतकऱ्यांची भूमी
सर्व धर्म समभाव असे
अशी ओळख अमुची जुनी

करी असाध्य रोगनिवारण
अशी आयुर्वेदाची महती
महिमा समजावुनी वेदाचा
परिचय करुनिया अवघ्या जगती

योगाचे महत्व समजले जेव्हा
पाश्चात्यांनीही केले अनुकरण
थोर महिमा ऋषीमुनींचा
जोपासावा करुनिया स्मरण

शिलेदार आम्ही देशाचे
आहोत उद्याचे आधारस्तंभ
वसा घेउनि सुराज्याचा
हाती हात घेउनिया संग

गाऊनी तुझी महती अखंड
पर्वणीच तशी आज विशेष
नतमस्तक सदा तुझ्या चरणी
असा भारत माझा देश .... ….


..माझा भारत देश .... !!

नात विश्वासाचं ..

फुलावी वेल नात्यांची
जणू दवबिंदूच्या पात्यावर ...
बीजे रुजावी ... आपुलकीची
गोड विश्वासाच्या नात्यावर …

धरुनी कास सत्याची
नात्यात गोडवा असावा …
स्मरूनी गोड आठवणी
चेहराही खुलून दिसावा …

धरलं तर राहतं जवळ
अन सोडलं तर सुटतं …
नातं हे विश्वासाचं
टिकवावं … तरच टिकतं ...

जिव्हाळ्याच्या नात्यात
प्रेम देई गंध नवा …
छानशा सोज्वळ नात्यात
संग ...सार्थ विश्वास हवा …

संग पाऊले टाकू पुढे
घेउनी हात हाती …
निर्मळ वृत्ती अंगिकारू
अन … जपूया विश्वासाची नाती … !!

मन पाखरू उनाड...

कधी मला वाटतं स्वच्छंद पाखरू मी व्हावं,
पंख ते पसरुनी उंच गगनात झेपावं...

कुण्या गावच्या दूर नदीकाठी फिरावं 
 अशा ठिकाणी जिथं कुणी कुणी नसावं...

कधी मला वाटे लहानसं लेकरू मी व्हावं,
घट्ट बिलगुनी आईच्या कुशीत मी निजावं...

कधी मला वाटे गायीचं वासरू मी व्हावं,
अपार ओढीने तिच्या अवतीभवती घुटमळावं...

कधी मला वाटे कवीचे काव्य सुंदर व्हावं
मनीच्या भावना वेचून छान शब्दात मला गुंफाव...

कधी मला वाटे नाविकाची नौका मी व्हावं,
वाऱ्याच्या दिशेने स्वतः बेफाम भिरकावं...

मन माझं पाखरू उनाड, विहरते उंच आकाशी
जगणं माझं धुंद स्वच्छंदी, गीत सजवून माझ्या सुरांशी ... !!