बुधवार, 5 नवंबर 2014

नाती ...

जपली या जीवनी
मी कैक नाती जरी …
काही सपशेल खोटी
काही वरवर खरी …

खोट्या अशा हास्यामागे
भाव होते बनावटी ...
समोर होई उदोउदो
अन द्वेष आपल्यापाठी …

तस ही नातं टिकवायला
हल्ली कुणाला असतो वेळ ...
मृगजळामागे धावून
रंगे भातुकलीचा खेळ ...

काही नाती असतात
फक्त आठवणींमधे ...
क्लिष्ट वाटे वरून
तरी आतून फार साधे …

काही नाती मात्र
क्षणभंगुर असतात ...
विरून गेली तरी
आठवणींमध्ये दिसतात …

आठवणीच मळभ कधी
अचानक दाटून येतं ...
दुरावलेल्या नात्यांना
अवचित भेटून येतं ...

हिरमुसलं मन कधी
नात्यातला आधार शोधतं
साथ मिळेल सदा
असं कुणी साथीदार बघतं …

मिळाला असा सोबती की
नात्यातली गंमत कळते
अर्थ नात्याचा तेव्हाचं कळतो
जेव्हा छान रेशीमगाठ जुळते …

स्वच्छंद होऊन जगताना
कसं भान हरपून जावं..
कुणाच्या डोळ्यात हरवून जाऊ
इतकं आपलंसं कुणी हवं ... ….

इतकं आपलंसं कुणी हवं … !!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें