गुरुवार, 1 मार्च 2018

कविता , अशीही !

आज मी म्हणतोय पुन्हा कविता लिहू
पहिल्यासारखी एकदा परत जमते का पाहू

लेखणी हातात घेऊन फार काळ लोटला होता
हाती तिला पाहून हातालाही कंप सुटला होता

बाह्या सरसावल्या अन हातात लेखणी घेतली
पण कवितेची tube माझी जरा उशिराच पेटली

धीर थोडा धरला आणि वही माझी उचलली
धुळाने माखलेली,अलगद वरची धूळ मी झटकली

प्रेमकविता विरह गीत हे तर विषय सारे जुने
विडंबन, निसर्ग कविता करावी का निमूटपणे

आता मात्र मनाची पुरतीच चलबिचल झाली
कवितेच्या विचाराने माझी झोप चांगली उडाली


कविता आता होईना, झाली अंगाची लाही लाही
अन मनातली कविता  पानावर उतरलीच नाही

यमक, शब्द, भाव यात माझी भलतीच वाताहत झाली
हीच चलबिचल अखेर आपसूक कवितेत कैद झाली ... !!

ओढ .. पुन्हा बालपणाची !

(बालपणाची ओढ आणि आताची तडजोड याची एका "प्रौढ" होत चाललेल्या नजरेतून एक अनामिक सफर .....)



प्रिय बालपण,


तुझी आठवण काढावी इतका वेळ देऊ शकतो याचीही शाश्वती नाही. पण जमेल तितका वेळ, जमेल तितके शब्द जोडून तुझ्याशी थोडं हितगुज करावं यासाठी ही खटपट. खटपट यासाठी कि जसंजसं वय वाढत चाललंय तसंतसं तुझ्या माझ्यातला दुरावाही वाढतोय. तुझ्या आठवणींचा पट अंधुकसा अस्पष्ट व्हायच्या आधी तुझ्या तरल धुंद स्मृतींमध्ये पुन्हा चिंब व्हावं असं प्रकर्षाने जाणवतंय. तुझ्या आठवणींचा पसाराच इतका अथांग आहे कि त्याच्यात गुंग व्हायला होतं , मग वर्तमानाचं  भान राहत नाही. कदाचित तसंच असावं म्हणून तर जगाच्या रहाटगाडग्यात जुंपून राबताना थोडीशी उसंत नाही गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी.



आजकाल ऑफिसच्या चार भिंतीतून एका जागी बसून जगाचे व्यवहार करावेत इतका मोठा झालोय मी ... खरंच का ? लॅपटॉपवरती धडाधड फिरणारी बोटं ... कधी लहानपणी याच बोटांनी गोट्या, लगोरी असे खेळ खेळले होते याचं अजबच वाटतं.  हीच का ती बोटं ज्याने लगोरीचे थप्पे  रचले होते , गोट्यांचा राजाराणीचा डाव रंगवला होता. आजकाल व्हाट्सऍप, स्काईपवर हाय-हॅलो केलं कि भेटल्याची फिलिंग येते पण त्याला फुटकळ क्षुल्लक कारणाने मित्राला कट्ट्यावर भेटून गप्पांचा जो फॅड रंगवला होता त्याची सर येईल का ... लहानपणी पै-पै  साठवून केलेल्या खरेदीला आताच्या ऑनलाईन वा मॉलच्या शॉपिंगची सर येईल का ?



ऑफिसमधून घरी जाताना ग्राऊंडवर खेळणारी लहान मुले पाहिली कि त्यातलाच एक चेहरा मला माझा भासतो. तेव्हा मळलेला शर्ट आताच्या प्रेस केलेल्या ब्रँडेड शर्टापेक्षा प्यारा वाटू लागलाय कारण तेव्हा शर्ट मळलेले असायचे  पण मन मात्र निर्मळ ... आणि आता मात्र फक्त दिखाऊपणाचा मास्क घालून वावरल्यासारखं  वाटतंय. नव्या कोऱ्या वह्या -पुस्तकांचा वास, PT च्या तासाला केलेली धमाल, शिक्षकांना दिलेली टोपण नावं, पावसाळ्यात बनवलेल्या कागदी होड्या...  किती आनंद होता या लहानसहान गोष्टीत .. आणि आता पैसे मोजले तरी असलं निखळ सुख कशातच मिळणार नाही.  लहानपणी एकावर एक मनोरे रचून किल्ला बांधताना जे चिमुकले हात सरसावले होते तेच कधी २-३ bhk च्या financial  प्लॅनिंगमध्ये जखडले गेले कळलंच नाही.  नटराज,अप्सराच्या पेन्सिलला जे हात सरावले होते, तेच आता कीबोर्डवरची धूळ साफ करत Emails, मिटींग्समध्ये शब्दांचा औपचारिकपणे खेळ मांडतात. चंपक, ठकठक, पंचतंत्राच्या गोष्टी वाचणारी नजर कधी शेयर मार्केट, फंड value पाहून भिरभिरू लागली कळलंच  नाही. लहानपणी घड्याळ हाती नसतानाही कुठली गोष्ट करायला वेळेचं  बंधन कधी आलं नाही , वय वाढलं ... तसं घड्याळ हातात आलं पण वेळेचं गणित काही सुटलं नाही, घड्याळाच्या काट्याप्रमाणे जगणंही आता यांत्रिक झालं.  "लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा " म्हणत तुकाराम महाराजांनी बालपणाची थोरवी अभंगातून का गायिली असेल याची प्रचीती आज मोठं  होऊन येतेय.



कुठे आहे .. कुठे जायचं

याचा नसे ठाव

अल्लड बेभान जगाया

वाटे पुन्हा लहान व्हावं



जीर्ण झाले पाय जणू

संकोचल्या वाटा

मागे फिरून वाटे

पुन्हा लहान व्हावे आता .... !!





लहानपणी कुणाच्या तरी हाताला धरून दुडूदुडू पळायची जी गंमत होती ती खरंच आज पुन्हा अनुभवता येईल का ... ? आज हक्काचा आधार मिळणं दुर्मिळ झालंय ,तेव्हा कितीतरी हात जवळ करायला सरसायचे ... पाहुण्यांनी जाता जाता दिलेले ३०-४० रुपये म्हणजे जणू कुबेराची खाण गवसल्याचा आनंद व्हायचा ... तेव्हा कधी भविष्याची चिंता नव्हती,फक्त न फक्त वर्तमानात जगायचं  होतं ... आता मात्र "भविष्यासाठी" जगावं लागत ... उद्याची तरतूद करून ... खरंच  ना , खूप बदललंय सारं !



कधी वाटतं त्या "नायक" सिनेमातील हिरो अनिल कपूरला जसं  एक दिवसाचं मुख्यमंत्री बनता आलं , तसं आपल्यालाही बालपण पुन्हा नव्याने अनुभवता यावं .. कपडे मळेपर्यंत मैदानात खेळायची गंमत पुन्हा फील करता यावी ...  पुन्हा एकदा शाळेत जाऊन बालपण जगता यावं, बालपणीचे सवंगडी, पावसाळ्यातली पिकनिक, स्कूल gathering मधली मज्जा पुन्हा घेता यावी, पण क्षणात वस्तुस्थितीच भान येऊन हिरमुसल्यागत होतं.



खरंच  ना , भौतिक सुखामागे धावताना जी घुसमट होतेय त्यापेक्षा या साऱ्याची जाण नव्हती ते जग हवंहवंसं  वाटू लागलंय  ... तुझी ओढ लागलेय !!



सैरभैर जीव कसा

धावतो मृगजळामागे

लागे हुरहूर जीवाला

मन डोळे मिटुनी जागे



खरंच, स्वछंदी जीवनाची खरी परिभाषा म्हणजे बालपण !!



ना आकाशाची सीमा

ना उडण्याचे बंधन ...

जीवनाचा अर्थ उमजण्या

पुन्हा "जगावं" बालपण ...



अरे रे ... काय हे .. तुझ्या आठवणीत एवढं गुंग झालो कि वेळेचं  भानचं राहील नाही.. क्षणभर विसरचं पडला होता या धकाधकीच्या क्षणांचा.  हे बघ ,मला माझं जग हाक मारतंय , पुन्हा भिंगरीगत स्वप्नांच्या मागे धावायला, यंत्रासारखं राबायला.   बघूयात , पुन्हा तुझ्या आठवणींची पानं  चाळायला कधी फुरसत मिळते ... तोपर्यंत तूर्तास गुडबाय ... !



तुझाच सीनियर व्हर्जन .. !!
- वैभव